औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा एका अल्पवयीन मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमने याप्रकरणी माफी मागावी अन्यथा एमआयएमची शहरातील कार्यालये फोडू असा इशारा कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून दिला होता. या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमकडून देखील एक विडीओ प्रसिध्द करण्यात आला आहे. इम्तियाज जलील यांच्या या व्हिडीओत ते त्या अल्पवयीन मुलाचा एमआयएमशी काहीही नसल्याने माफी मागण्याचा संबंध नसल्याचे म्हणत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून आ. हर्षवर्धन जाधव शहरातील वातावरणात खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी स्वतः पोलीस कमीशनर यांना केल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. याबरोबर एमआयएमचे कार्यलये फोडू, घुसुन मारू अशी भाषा करणार्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी एमआयएम आ. इम्तियाज जलील यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर किंवा अन्य महापुरषांवर कुणाचाही काॅपीराईट असु शकत नाही. ते सर्वांचेच महापुरूष आहेत. त्यामुळे पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.